छत्रपती शिवाजी महाराज आरती — भावनेतून दैवतीकरणाकडे जाणारा धोका
सध्या अनेक व्हॉट्सॲप/सोशल मीडिया ग्रुपवर “छत्रपती शिवाजी महाराजांची आरती टाका” आणि “१९ फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रुपवर ही आरती टाका” असे संदेश फिरताना दिसतात. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांबद्दलचा आदर, प्रेम आणि भावनिक ओढ ही स्वाभाविक आहे. पण इथे एक गंभीर मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे—भावनेच्या भरात आपण शिवरायांचे दैवतीकरण तर करत नाही ना?

आज आरती म्हणत आहात…
उद्या नारळ फोडाल…
परवा नवस बोलाल…
नंतर अंगात येईल…
मग भोंदू “महाराज” येतील…
आणि मग कर्तृत्वाला चमत्कार समजून,
तुम्ही एका दैदीप्यमान पुरुषाच्या कर्तृत्वावर पाणी फेराल…
हा संभाव्य धोका ओळखून तात्काळ शिवरायांची आरती म्हणणे/पसरवणे थांबवले पाहिजे. शिवजन्मोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी पंचारती, कापूर-अगरबत्ती, आरतीचे ताट ओवाळत शिवरायांची आरती म्हणण्यात आली—हे थांबले पाहिजे.
भविष्यातील पिढीला आपण कोणते शिवराय देऊ इच्छितो?
चमत्कारिक देव की कर्तृत्ववान महापुरुष?
एकदा दैवतीकरण सुरू झाले की शिवरायांचा समग्र पराक्रम “चमत्कारातूनच घडला” असा गैरसमज पसरवायला भोंदूबुवा मागे-पुढे पाहणार नाहीत. आणि मग समाजाचे लक्ष इतिहास, संघर्ष, शौर्य, रणनीती, नेतृत्व, प्रशासन, राष्ट्रनिर्मिती यावरून हटून अंधश्रद्धा आणि चमत्कार याकडे वळते.
शिवाय आपल्याकडे ३३ कोटी देव असताना अजून एका देवाची आवश्यकता कशासाठी?
मागे एका चित्रकाराने शिवरायांचे अनेक हात दाखवणारे चित्र रेखाटून दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. काही मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्या चित्राचे भरभरून कौतुकही केले होते. नेमके हे सर्व कशासाठी?
शिवराय देव नाहीत — शिवराय महामानव आहेत
शिवराय हे महापुरुष आहेत. मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावर—स्वकर्तृत्वातून, पराक्रमातून, संघर्षातून—शिवरायांनी जो दैदीप्यमान इतिहास घडवला, तो कोणत्याही चमत्कारिक देव-देवतांपेक्षा कैक पटीने श्रेष्ठ ठरतो. प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर ३३ कोटी देवांची फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते.
तेव्हा अकारण, भावनेच्या भरात दैवी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून शिवरायांना पाहणे थांबवावे. शिवराय हे जागतिक कीर्तीचे, महापराक्रमी, कर्तृत्ववान महामानव आहेत.
महत्वाची सूचना
शिवरायांच्या आरतीला पर्याय म्हणून “जिजाऊ वंदना” म्हणावी.
जय जिजाऊ! जय शिवराय! 🚩
✍️ स्वप्निल श्रीमंत घुमरे (छत्रपती संभाजी नगर)
#शिवजयंती #मराठा #छत्रपतीशिवराय